घाटीतील पोलिस चौकीवर वाढला एम.एल.सी.चा भार

Foto

औरंगाबाद: शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) पोलिस चौकीत कर्मचारी अपुरे असून, जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून येणार्‍या रुग्णाच्या एम.एल.सी. चा भार पडत असल्याने या चौकीत आणखी कर्मचारी नेमण्यात यावेत, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

घाटी रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना तातडीने पोलिस प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नसल्याने  तत्कालीन पोलिस आयुक्‍त अमितेशकुमार यांच्या पुढाकाराने रुग्णांच्या सुविधेसाठी सुसज्ज अशी पोलिस चौकी उभारण्यात आली. अपघात, हत्या, जळीत प्रकरणे, हाणामारी इत्यादी प्रकरणात पोलिसांना एम.एल. सी. दाखल करून ती संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करावी लागते. यासाठी या चौकीत औरंगाबाद शहर पोलिस दलातील चार कर्मचारी आणि ग्रामीण पोलिस दलातील चार कर्मचारी अशी आठ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळी चार आणि रात्री चार अशा शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करीत असतात. मात्र, औरंगाबाद जिल्ह्याबाहेरील एम. एल. सी. साठी एकही विशेष कर्मचारी नेमण्यात न आल्याने महाराष्ट्र व राज्याबाहेरील रुग्णांचीदेखील एम. एल. सी. याच कर्मचार्‍यांना करावी लागत आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्याबाहेरील रुग्णच्या एम. एल. सी. साठी कर्मचारी नेमावेत, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्याबाहेरील डेथ एम.एल.सी. मुळे अनेक अडचणी
अपघात, हत्या, हाणामारी, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे घडल्यानंतर नागरिक अनेकवेळा जखमी रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून थेट घाटी रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे त्याची नोंद घाटी पोलिस चौकीत होते. त्यानंतर चौकीतील कर्मचारी संबंधित ठाण्याला जेव्हा एम. एल. सी. पास करण्यासाठी फोन करतात तेव्हा जिल्ह्याबाहेरील अनेक पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराकडून प्रतिसाद मिळत नाही व दुसरीकडे मृत्यू पावलेल्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत  हातातील कामे सोडून चौकीतीलच पोलिसांना मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यापूर्वी पंचनामा करावा लागत आहे. अशा घटना दिवसाआड घडत आहेत.